Monday, 16 October 2017

Ambe Nal - Kalamjai Platue - Bhimashankar - Khetoba - Vajantri Ghat Range Trek


महिन्याभरापूर्वी राहुल बसणकर ने विचारणा केली होती एक अनवट वाटेची आणि मी लगेच हो म्हणून आम्ही १४-१५ ऑक्टोबर च्या ट्रेकचा बेत नक्की केला. गुगल सर्च केल्यावर कळलं की हा ट्रेक सहसा कोणी करत नाही, कारण फक्त एकच पोस्ट होती २०१४ ची, त्यामुळे उत्सुकता/उत्कंठा वाढलेली होती. ट्रेक मध्यम श्रेणीत मोडत असला आणि दमछाक करणारा असला तरीही पावसाची शक्यता पाहता आम्ही त्यानुसार सर्व तयारी केली होती.
आणि तो दिवस उजाडला.... मी, राहुल, नितीन, अभिजित आणि सोहम असे पाचजण तयार होतो. शुक्रवारी रात्री ऑफिसमधून निघताना उशीर झाला होता तरीही सवयी नुसार १५-२० मिनिटात बॅग भरून सकाळी ठाण्याला ट्रेन पकडून नेरळला साधारण ८ वाजता पोहोचलो. नितीन ने मुलुंड वरून येताना माझं तिकीट अगोदरच काढलं होतं त्यामुळे वेळ वाचला होता. नेरळला नाश्ता करून, ठरवल्याप्रमाणे गाडीने जामरुंगला निघालो.वाटेत एका अवाढव्य शिंगाच्या बैलाने दर्शन दिले, गाडी थांबवून त्याला कॅमेऱ्यात कैद करून पुन्हा पुढचा प्रवास.दूर डावीकडे पदरगड आणि उजवीकडे पेठचा किल्ला आम्हाला सर्व वाटेवर खुणावत होता. सकाळ अगदी प्रसन्न होती,९:३० गावात पोहोचलो (कशेळीतुन एक वाट खांडसला तर उजवीकडून जामरुंगला जाते).
जामरुंगला पोहोचल्यावर एका मावशीने आम्हाला पाच खडकपाडा आणि ठाकरवाडीचा रस्ता दाखवला.


सकाळी ९:५० ला endomondo सुरू करून वाट सुरू झाल्याबरोबर एक ओढा ओलांडून आम्ही आमच्या बुटांचे ओढ्याच्या पाण्यात सिमोल्लंघन करून घेतले (राहुल सोडून). शेतीचा हंगाम असल्याने वाटाड्या पाचखडक पाड्यातून घेण्याचं ठरलं. आमच्या सुदैवाने रमेश गावातच भेटला आणि आम्ही आंबे नाळीकडे प्रस्थान केलं.
 
 ठाकर वाडीत अवघी ५-६ घर होती आणि सारेजण शेतात असल्यामुळे घरं बंद होती, त्यामुळे आमचा पाचखडक पाड्यातून वाटाड्या घेण्याचा निर्णय रास्त ठरला. ठाकरवाडीतून थोडी मळलेली पायवाट पुढे गेल्यावर गवतात व रानात हरवून गेली होती. इथे मळलेली वाट नाही त्यामुळे गावातून आंबे नाळ पठारापर्यंत वाटाड्या घेणं आवश्यक आहे.


नाळ सुरू होण्या अगोदर एका ओढ्याकाठी थोडी विश्रांती घेऊन नाळ चढायला सुरुवात केली.
एव्हाना सकाळचा गारवा जाऊन घाम निथळायला सुरुवात झाली होती आणि आम्हा सर्वांना मनापासून वाटत होतं की पावसाचा शिडकाव व्हावा. वरुन राजाला बहुतेक आमच्या मनातलं कळलं आणि नळीच्या मध्यावर आल्यावर जोरदार सरी बरसू लागल्या, पटापट सर्वांनी बॅगेला रेनकोट घातला, मोबाइलला प्लास्टिक मध्ये गुंडाळून ठेवला. पावसात भिजून आमचा थकवा कुठच्या कुठं गेला आहे.


आता पदरगड आमच्या मागे होता.....
 

त्याचा आणि धुक्याचा लपाछपीचा खेळ चालू होता, नितीन ने तो मोबाईच्या timeless option मध्ये लगेच टिपून घेतला. दुपारी २:१५ वाजता आम्ही आंबे नाळीच्या पठारावर पोहोचलो. पावसाने आता विश्रांती घेतली होती. मघाशी पाऊस पडून गेल्यामूळे वातावरण पुन्हा कुंद झालं होतं, मधेच सूर्य नारायनही दर्शन देत होता. पठाराने जणू सोनकी आणि मंजिरीची शाल पांघरलेली होती. कॅमेऱ्यात सर्वकाही टिपून झाल्यावर लसनाच्या चटणी आणि चपाती ने उदरभरण करून घेतल. रमेशला सांगून ग्रुप फोटो काढून घेतले. आता आमची खरी कसोटी होती, कारण रमेश फक्त पठारपर्यंत येणार होता आणि पठारावर वाट चुकण्याची दाट शक्यता होती. त्याला पुढंचा कळमजाईचा रस्ताही माहित नव्हता, तरीही त्याला आम्ही आमच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. आमच्या सुदैवाने राहुलच्या मोबाइलला रेंज आली आणि आमचा मित्र मधुकर धुरी (ज्याला इथून पुढे जाण्याचा रस्ता माहीत होता) चा संपर्क झाला. त्याने अगदी योग्य मार्गदर्शन करून आमचा हा तिढा सोडवला. इथे घळी कडे पाठ करून ९० अंश डावीकडे २०० मीटर जंगलाकडे जाणे आणि जंगलातील साधारण ५० मीटर घळ उतरून पठारावर येणे, हेच ते कळमजाई पठार.
पठारावरून थोडं उजवीकडे पुढे गेल्यानंतर लगेचच डावीकडे साधारण ५०० मीटरवर कळमजाईच मंदिर आणि झेंडा दिसेल (लोभी चा रस्ता इथेच मिळतो) नीतीनने दोन वर्षांपूर्वी लोभी केला असल्यामुळे त्याला इथे आल्यानंतर मंदिर आठवलं. इथे मळलेल्या वाटा बऱ्याच असल्याने पुन्हा गूगल मॅप वैगेरे सोपस्कार झाले (नितीन आणि सोहम अजूनही लोभीचा रस्ता आठवायचा प्रयत्न करताहेत) देवीकडे तोंड करून मंदिरापासून ९० अंश उजवीकडे एक उतरण लागेल तो रस्ता सरळ गुप्तभीमाशंकरला जातो.
(मंदिराच्या समोरून एक रस्ता भोरगिरीला जातो). उतरणीला लागल्यावर आता दोघांनाही (नितीन आणि सोहम) साक्षात्कार झाला की हाच तो मोठा ट्रॅव्हर्स जो उजवीकडे खाली भीमा नदीच्या तिराने गुप्तभीमाशंकर जंगलाजवळ जातो. निसर्गाने इथेही सोनकीच्या आणि तेरड्याच्या फुलांची मुक्त उधळण करून त्याची आरास सर्वदूर केली होती. आमचा वाटाड्या रमेश आता इथून माघारी जातो. फोटो काढण्याचा मोह काही आवरत नव्हता, Slow-mo, timeless असे व्हिडिओ करत ट्रॅव्हर्स संपला. ट्रॅव्हर्स संपल्यानंतर भीमा नदी ओलांडून पुढे मार्गक्रमण सुरू केले (पावसाच्या आणि पाण्याच्या अंदाजाने नदी पार करावी). पुढे भीमा नदिवरच बांधलेला एक छोटा पुल आहे, पुलावरून डावीकडे थोडं पुढे गेल्यावर ओढ्याच्या डावीकडे एक वीरगळ आहे, इथे रस्ता चांगलाच मोठा आणि मळलेला आहे.

आता संध्याकाळचे ५:१५ वाजले होते आणि मळभ दाटून आलं होतं आणि अंधार पडू लागला होता. आम्ही साधारण १० मिनिटात पुढे जंगलातून गुप्तभीमाशंकराकडे पोहोचलो. आम्ही सगळ्यांनीच गुप्तभीमाशंकर पाहिलं होतं म्हणून खाली न उतरता मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिराजवळ पोहोचल्यावर नीतीनने आणि राहुलने प्रथम मुंबई डब्बेवाल्यांच्या धर्मशाळेत आश्रय मीळतो का ते बघितलं, आमच्या सुदैवाने आम्हाला एक रूम मिळाली. सर्वांनी चहा बिस्कीट खाऊन, फ्रेश होऊन भीमाशंकरच्या शिवलंगाचे निवांत दर्शन घेतलं. मंदिराबाहेर फेरफटका मारत, मज्जा मस्ती करत, गरमागरम कांदे भजी आणि चहा पिऊन पुन्हा धर्मशाळेत आलो. तोपर्यंत धर्मशाळेत ताईंनी जेवन करून ठेवलं होतं.... खूपच स्वादिष्ट जेवण..., त्यावर ताव मारून अंथरूनावर गप्पांची मैफल रंगते. उद्या दुपारच्या जेवणाची सोय ताईंनाच करायला सांगीतली आहे. आज जास्तच दमल्यामुळे एक-एकाची विकेट पडायला (झोपायला) सुरुवात होते, मधेच सोहमची गाडी घाटाला लागाते. अशाप्रकारे आजच्या साधारण ७ तासाच्या ट्रेकची सांगता होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी जरा निवांतपणे उठलो, चहा नाश्ता करून ८:३० ला पुन्हा गुप्तभीमाशंकर, भीमा नदी, ओलांडून कमलादेवी मंदिरापर्यंत आलो. राहुलला खेतोबा मंदिरापासून पुढचा रस्ता माहीत होता. आता पुन्हा कामलादेवी मंदिर ते खेतोबा मंदिराच्या मार्गाचे गूगल मॅपचे सोपस्कार.... वाटेत कुणीच नव्हतं व आमचं रास्ता शोधणं चालू होतं. तेवढ्यात हाक ऐकू आली, एक गुराखी काका ( विष्णु काटे) आमच्याच दिशेने गुरं हाकलत येत होते, त्यांना वाट दाखवण्याची विनंती केली, त्यांनी मोठ्या आनंदाने हो म्हंटलं व आमच्या जीवात जीव आला. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला घाटात 'ढकलून देतो' त्यानंतर तुम्ही पुढे जा. आम्ही तयार झालो कारण त्यापुढे राहुलला वाजंत्री घाटरस्ता ठाऊक होता. काकांनी गुरांना खालच्या गावात त्यांच्या घरी सोडून येईपर्यंत १५-२० मिनिट आम्हाला वाट बघायला सांगितले. राहुल तोपर्यंत गाडीवल्याला फोन करून ४:०० वाजता जामरुंगला यायला सांगतो.... चला एक चिंता मिटली होती.


निवांत वेळ होता, आता कळमजाई पठारानेसुद्धा धुक्याची दुलई पांघरली होती व त्यांचा पळापळीचा खेळ चालू होता. काका येईपर्यंत आम्ही मनसोक्त slow-mo व्हिडीओ करून घेतले. काका आले व पुन्हा खेतोबा मंदिरापर्यंत प्रवास चालू झाला. कळमजाई मंदिरा समोरून डाव्या बाजूने थोडं मागे जाऊन छोटा जंगल पॅच ओलांडून बामनेर पठारावर आलो. पुढे कोपतर खिंड ओलांडून पिपर्वन पठारावर आलो. इथे रस्त्याच्या दुतर्फा दगड लावून चांगली वाट केली आहे (लोभीचा रस्ता तो हाच). इथेही नितीन व सोहमला साक्षात्कार होतो.

 
राहुल व नितीन मागे पडलेयत, अम्ही त्यांची वाट पाहत असेपर्यंत विष्णू काकांनी दोन चांगल्या काठ्या तोडून आणल्या. पिपर्वन पठार ओलांडून खेतोबा पठार चालू झालं आहे ( इथे सर्व पठार एकमेकांना लागून आहेत). वाटेत वनखात्याने एक तलाव बांधला आहे, त्याच्या २०० मीटर अलिकडून उजव्या दिशेला साधारण ४००-५०० मीटरवर खेतोबा मंदिर आहे (धुक्यामुळे इथे चुकण्याची शक्यता आहे).

Khetoba Temple

मंदिरात खेतोबाचं दर्शन घेऊन, फोटो काढून, गूळ-खोबर खाऊन १२ वाजता वाजंत्री घाटाच्या घळीकडे आलो. वाजंत्री घाटाची घळ मंदिराच्या उजवीकडे २०-२५ मीटरवर आहे. इथे आम्ही विष्णू काटे काकांना रस्ता विचारून निरोप दिला. आम्हाला एक देवमाणूस भेटल्याचं समाधान होतं. कोणतीही अपेक्षा न ठेवता काका आमच्यासाठी रास्ता दाखवायला तास दीड तास पुढे आले होते.


काकांचा निरोप घेऊन घाट उतरायला सुरुवात केली, इथेही वाढलेल्या गवताने वाट लुप्त झाली होती. आमच्याकडे शिडीच्या वाटेचा पर्याय होता परंतु पावसामुळे तो आम्ही टाळला. घाट उतरताना पुन्हा पावसाने जोरदार आगमन केलं, समोरच्या डोंगर रांगेतून दुधाळ धारा चालू झाल्या होत्या, हे निरागस निसर्गसौंदर्य नजरेत साठवून घेत आमची निसरड्या वाटेवरून घाट उतरन चालूच होती. दोन-तीन थांबे घेत साधारण ३:३० ला आम्ही खालीं आलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते, एका खडकावर सर्वांनी ताईंनी दिलेली बटाट्याची भाजी आणि चपाती मस्त हादडली. पोटोबा प्रसन्न झालेत... पुढच्या प्रवासाला सुरुवात. पुन्हा गूगल मॅप... दिशा वैगेरे ठरलं आणि जामरुंगकडे वाटचाल चालू होते. निमणीची वाडी/सराई वाडी, कामत पाडा असे करत साधारण ४:४५ ला गावात पोहोचलो. ठरल्याप्रमाणे गाडीवाला आला होताच. गावात एका घरात कपडे बदलून आठवणींना उजाळा देत परतीचा प्रवास चालू.....डोक्यात पुढच्या ट्रेकचं प्लॅनिंग....

लेखन: सुरेश देवकर

Ayudh Adventures assures you exploring with MORE SAFETY and ENHANCED EXPERIENCE! Do visit our website for upcoming trek schedules and like our facebook page. Let the world know we are alive. Giv'em a Shout!

Ayudh Adventures paytm Code for funds Transfer

Dear Trekkers, Avoid last moment hassles to register yourself on any trek.                                     We...